माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून तांडा वस्ती मधील विकास कामांना निधी मंजूर

श्री. आदिनाथ कपाळे यांचे विशेष प्रयत्न

राजापूर:- (प्रमोद तरळ) राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या शिफारशीनुसार वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सन २०२३-२४ करीता राजापूर तालुक्यातील ३ गावातील विकास कामांना प्रशासकीय मान्यता देऊन ३० लाखाचा निधी वितरित करण्यात आला. राजापुर तालुक्यात अनेक ठिकाणी तांडा वस्ती म्हणजेच धनगर वाडे आहेत, परंतु तेथील लोकांना रस्ते व्यवस्थित नसल्या कारणाने ये- जा करण्यासाठी अत्यंत अडचणी येतात. या अनुषंगाने आपल्या भागातील धनगर वाड्यातील रस्त्याची सुधारणा व्हावी आणि ते रस्त्यांना मंजूर मिळावी यासाठी गेले १ वर्ष पंचवार्षिक बृहत् आराखडा बनवण्यापासून ते सदरचा प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या मार्फत तयार करून शासनास सादर करेपर्यंत सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक तथा तुळसवडे गावचे सुपुत्र श्री. आदिनाथ कपाळे यांनी विशेष प्रयत्न घेतले.
सदर कामांमध्ये राजापुर तालुक्यातील मौजे दोनिवडे धनगरवाडी ते मातेश्वर मंदिर येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, मौजे विखारे गोठणे मुख्य रस्ता ते धनगरवाडा येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे आणि मौजे ताम्हाणे पहिली वाडी ते धनगरवाडी येथे नविन रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी प्रत्येकी १० लाख असे ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कामाला मंजुरी दिल्याबद्दल सदर गावाकडून माजी राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत आणि त्यांचे स्वीय सहाय्यक श्री. आदिनाथ कपाळे यांचे जाहीर आभार मानण्यात आले.

Exit mobile version