रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा सर्व जागा लढण्यास इच्छुक- राजेश सावंत.

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात जिंकण्यासाठीच लढणार

रत्नागिरी : महायुतीत लढायचे असेल तर किमान दोन जागा आणि मैत्रीपूर्ण लढत करायची असल्यास पाचही जागा लढवू. या पाचही जागा जिंकण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात लढू. या जागांवर निवडणूक लढवण्यास मिळावी, अशी कार्यकर्त्याची इच्छा आहे, असे प्रतिपादन दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाजपाच्या जिल्हा बैठकीत व्यक्त केले. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनीही पाचही लढवूया, असा एकमुखी प्रतिसाद दिला.

भाजपा नेते, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याप्रसंगी राजेश सावंत यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. लोकसभा निवडणुकीत आम्ही मताधिक्य देऊ शकलो नाही. परंतु भाजपाची मते कमी नाहीत, आजही कार्यकर्ता निवडुकीत झोकून देऊन काम करतो, असे सावंत यांनी सांगितले. भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुकीलाही फायदा होऊ शकतो. आता आम्हाला थांब म्हणून सांगू नका, कार्यकर्ता कामाला लागला आहे. विकासकामासाठी आम्ही आग्रही आहोत, असेही राजेश सावंत यांनी या वेळी सांगितले.

राजेश सावंत यांच्या भाषणामुळे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. लवकरच भाजपचे जिल्हा, मंडलांचे महाअधिवेशन आयोजित केले जाणार आहे. बूथ कार्यकर्त्यांचा मेळावासुद्धा घेतला जाणार आहे. आघाडी, प्रकोष्ठ, मोर्चा अध्यक्ष नेमणुका झाल्या आहेत. त्यांनी कार्यकारिणी पूर्ण करून घ्यायची आहे. पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम आपापल्या भागात होण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घ्यावी, अशा सूचना राजेश सावंत यांनी या वेळी दिल्या. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version