स्थानिक स्वराज्य संस्थांसह २०२४ ला केंद्र, राज्यात भाजपाची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा.

रत्नागिरी : वर्षभरात ५०० पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी २८४० घरांमध्ये संपर्क साधला तर १४ लाख कुटुंबात पोहोचाल आणि भाजपाचे संघटन अधिक मजबूत होईल. भाजपा मजबूत करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. वर्षभरात आपल्या कामातूनच भाजपाचे संघटन मजबूत होणार आहे आणि मग भाजपाचा पराभव कोणी करू शकत नाही. धन्यवाद मोदीजी ही पत्रं रत्नागिरी जिल्ह्यातून ५ लाख पाठवायची आहेत. महाराष्ट्रातून दोन कोटी पत्रं पाठवली जाणार आहेत. २०२४ च्या निवडणुका समोर ठेवून भाजपाचे महाराष्ट्र विधानसभेत १७० आमदार आणि केंद्रात ४०० खासदार निवडून आणायचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा, अशा सूचना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
               भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय सभागृहात मेळाव्यास प्रचंड गर्दी झाली होती. बावनकुळे म्हणाले की, भारत हा जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवताना आणि भारताला गतवैभव मिळवून देण्याचा, जगाला मानव संसाधने पुरवण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ ते २०३५ या काळासाठी महायज्ञ आयोजित केला आहे. या महायज्ञामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही दररोज दोन तास देऊन किमान ८ घरांमध्ये जावे. या तासांत केंद्राच्या योजनांचे दोन लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी पत्र, १८-२५ वयोगटातील युवा वॉरियर्सची निवड, नवमतदारांची नोंदणी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी यांची निवड करावी. या प्रमाणे वर्षभराचा आढावा मी घेणार आहे आणि त्यानंतरच नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करू. मी प्रत्येक बूथ कमिटीचा आढावा घेणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत भाजपाने मुसंडी मारली. त्याप्रमाणेच महाराष्ट्रात भाजपाला यश मिळवायचे आहे. आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेसोबतच युती करायची आहे. परंतु स्थानिक पातळीवरील निवडणुकीत स्थानिक पदाधिकारी काय म्हणतील त्यानुसार ठरवण्यात येईल. भाजपामध्ये कार्यकर्तासुद्धा अध्यक्ष होऊ शकतो, अन्य पक्षांसारखी घराणेशाही इथे नाही, असेही त्यांनी सांगितले.


               प्रदेशाध्यक्षांचा दौरा हा रत्नागिरीसाठी शुभशकून आहे. गेली २० वर्षे भाजपाला येथे आमदार, लोकप्रतिनिधी निवडून आणता आले नाही. ताकद वाढली आहे. या जनाधाराचे विजयात परिवर्तन होण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी मंत्र दिला आहे. त्यांचा आमच्याशी सातत्याने संपर्क आहे. चांगले झाले तर कौतुक व कामात कुचराई झाल्यास ते रागही भरतात. त्यांच्या दौऱ्याने भाजपाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटासोबत सन्मानाने युती झाली तर करू. अन्यथा भाजप स्वबळावर लढून विजयी होईल, असे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आपल्या भाषणात सांगितले. भाजपाचे कोकण प्रभारी तथा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी सांगितले की, आत्मविश्वासाने व जिद्दीने कामाला लागा. रत्नागिरीत कमळ फुलवायचे आहे. प्रभारी मंडल, बूथ कमिटीसोबत मी संपर्कात राहणार आहे. पुढच्या दौऱ्यात कामाचा आढावा घेऊ. स्थानिकांशी बोलून युतीसंदर्भात निर्णय घेऊ.
              आपण सत्ताधारी आहोत. त्यामुळे प्रशासनाकडून गरिबांची कामे करून घ्यायला शिका. केंद्र, राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवताना दर महिन्याला जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पुरवठा अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, एसटीचे विभाग नियंत्रक या कार्यालयात जाऊन माहिती घ्या, जनतेचे प्रश्न सोडवा. महिलेवर अत्याचार झाला तर कोणत्याही आदेशाची वाट न पाहता महिलेच्या मदतीसाठी जा. संशयिताला अटक केल्यास कोणती कलमे लावली आहेत हे पोलिसांकडून जाणून घ्या. याकरिता आपल्याला कायद्याचे ज्ञानही आवश्यक आहे. अत्याचार करणाऱ्यांची कोणतीही गय शिंदे- फडणवीस सरकार करणार नाही, असा विश्वास भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्यांना कोणतीही मदत केली नाही. गुन्हेगार मोकाट फिरत होते. परंतु आता आपले लोकाभिमुख सरकार आहे. महिलांवरील अत्याचार कमी झाले नसले तरी गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. अलिकडे अशा झालेल्या गुन्ह्यांत संशयित ७-८ पोलिस व शासकीय अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. याची माहिती आपण जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. सोशल मीडियाचा जास्तीत जास्त पण जपून वापर करा, अशा सूचनाही चित्रा वाघ यांनी दिल्या. महिलांना स्वतःच्या हक्क व अधिकारांची जाणीव महिला कार्यकर्त्यांनी करून दिली पाहिजे. याकरिता भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्यामध्ये फक्त भाषणबाजी न करता महिलांकडून माहिती घेत, प्रश्न विचारून संवाद साधत चित्रा वाघ यांनी मार्गदर्शन केले.
               व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, अॅड. बाबा परुळेकर, उत्तर रत्नागिरी कार्याध्यक्ष केदार साठे, ऐश्वर्या जठार, स्मिता जानकर, सुरेखा खेराडे, मृणाल शेट्ये, संतोष मालप आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच प्रदेशाध्यक्षांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि गणपतीची मूर्ती देऊन जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी केला. सचिन वहाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

Exit mobile version