57 वे मुंबई युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवल 2024 मोठ्या जल्लोषात मागच्या एका महिन्यापासून सुरू आहे. मुंबई युनिव्हर्सिटी ची युथ स्पर्धा विद्यापीठ स्तरावर आणि विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांसाठी खूप मोठी आणि मानाची समजली जाते. या महोत्सवामध्ये परफॉर्मिंग आर्ट्स, लिटरेचर आर्ट आणि फाईन आर्ट या विभागातील वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये हर्ष सुरेंद्र नागवेकर याने लिटरेचर विभागात वक्तृत्व स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावून या स्पर्धेचे मानाचे मानले जाणारे गोल्ड मेडल स्वतःच्या नावे केले. या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी कांदिवली येथे झाली होती, त्या फेरीत द्वितीय क्रमांक प्राप्त करत हर्ष अंतिम फेरीत दाखल झाला होता. अंतिम फेरी दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी, विद्यापीठ विद्यार्थी भवन चर्चगेट मुंबई येथे पार पडली. अंतिम फेरीसाठी ‘रील अँड रियल’ हा विषय देण्यात आला होता.
वेगवेगळ्या विभागातून जिंकून आलेले एकूण 44 स्पर्धक अंतिम स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. यामधून हर्षने विषयावरती केलेला अभ्यास, मांडलेले मुद्दे आणि आपल्या वक्तृत्व शैलीच्या जोरावर हे यश संपादन केलेले आहे. मूळचा रत्नागिरीचा असलेला हर्ष सध्या मुंबईमध्ये चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर कॉलेज ऑफ लॉ मालाड मध्ये वकील क्षेत्रात शिक्षण घेत आहे.
इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण हर्ष ने पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी मध्ये घेतले आणि तेव्हापासूनच वक्तृत्व शैली विकसित करायची सुरुवात त्याने शालेय जीवनात शालेय शिक्षकांच्या मदतीने केली. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांने अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी येथे घेतले. यादरम्याने सुद्धा हर्ष ने महाविद्यालयाला अनेक पारितोषिक मिळवून दिली. हर्ष सोबत बोलणे केले असता हर्ष ने सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
हर्ष चे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.