कृषी

शेतकरी संघटित झालाच पाहिजे..!

शेतकरी उत्पादकांनो, आपण मोठ्या संकटात वावरत आहोत गंभीर व्हायला हवे पावसाळी पीक घेणे कमी करून पर्याय शोधायला हवा. निष्पक्ष एकजूट करून क्रांती करूया – प्रा. सतीश फाटक- अध्यक्ष कोकण मित्र मंच,राज्य समन्वयक किसान क्रांती, महाराष्ट्र फळ उत्पादक शेतकरी महासंघ.
दरवर्षी कमी अधिक प्रमाणात पावसाळा अनियमित असतो ! सुरवातीला पाऊस न आल्यामुळे पीक पेरणी उशिरा होते. कशी तरी पाण्याची व्यवस्था करून पिक जगविण्यासाठी धडपड कधी पावसाळ्याच्या उत्तरार्धात बरा पाऊस येतो, कधी येत नाही. कधी जास्त भरपूर येतो पिकाची माती होते! अंतीम टप्प्यात पीक चांगले आले की मग विविध रोग, तूड-तुडा येत असतो. आणि होत्याचे- नव्हते होते. हातात येणारे पीक निघून जाते! शेतकऱ्यांना कापणी साठी सुद्धा परवडत नाही !
शेतकरी बांधवांना १०/२०/३० टक्केही पीक हातात येत नाही. पाऊस जास्त तरी शेतकरी मेला, नाही पडला तरी मेला, वेळेवर लावणी नाही तरी मेला, खोडकीडा आला मेला, अनेक प्रसंगात मेला, मेला,आणि मेला.
यदाकदाचित पीक आले तर भाव नाही. म्हणून मेला.सरकारी धान्य खरेदीही अनियमित असते.
काही वर्षांपूर्वी २५०० ₹ क्विंटल भाव मिळाला होता आज प्रचंड उत्पादन खर्च वाढूनही, सण २०१७ ला जेवढा भाव मिळत होता, तेवढाच भाव आजही सुरू आहे. महागाईची मात्र शेतकरी बांधवांना लागू नाही आणि कोणतेही सरकार आले तरी असेच करतात.. पावसाळी पिकांची अशी अवस्था आहे. उन्हाळी पीक बऱ्यापैकी होत असते मात्र उत्पादन खर्चा नुसार भावही मिळत नाही .आता दीड पट भाव देणारेही याविषयी बोलत नाहीत. आयात-निर्यात धोरणात दलाली असल्यामुळे पद्धतशीर पणे शेतमालाचे भाव पडले जातात !
सध्या तरी महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मागील ३०-४० वर्षा पासून शासनाचे कृषिविषयीक धोरण नसर्गिक/शेंद्रीय शेती पासून दूर नेणारेच ठरले आहे .आज शेती पूर्णपणे रासायनिक माध्यमात गेली आहे. शेतीची उत्पादन क्षमता खूपच कमी झाली आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. आज शेती ही पूर्णपणे भांडवलवादी व्यवस्थेच्या अधीन झाली आहे. शेतीमध्ये नवनवीन कल्पना राबविण्यात, पीक पद्धती व नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्या पर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण नेतृत्व अपुरे ठरत आहेत, त्यात आमूलाग्र बदल होणे आवश्यक. सतत यासाठी ग्रामीण भागात माहिती कार्यशाळा आयोजित करणे अत्यंत गरजेचे आणि मूलभूत आहे.
नवीन पिढी शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या कमजोर होत आहे, शेती क्षेत्रापासून दूर जात आहे. किंबहुना याला सरकार आणि शासन व्यवस्था जास्त जबाबदार आहे. आर्थिक, सामाजिक शोषनाच्या व्यवस्थेत राजकीय पक्षात विभाजित असलेले गांव पातळी पासुनचे नेते आणि त्यांच्यातील गट बाजी करण्यात गुंग आहेत. यामुळे व इतर विविध कारणांमुळे ग्रामीण समाज जीवन उध्वस्त होत आहे. आणि युवा दिशाहीन अवस्थेत वावरत आहे ही एक बाजू.
दुसरी बाजू अशी आहे की, कोणत्या वर्षी पावसाळी पीक व उन्हाळी पीक उत्पादन भरपूर होते मात्र खुल्या बाजारात भाव नाही.(२०१७ चा भाव आज २०२२ मध्ये आहे) पिकाचे उत्पादन जास्त झाले तर शासनाकडे पीक व तांदूळ’ साठवणूक करण्यासाठी गोदाम अपुरे पडत आहेत व विदेशात निर्यातीसाठी उत्तम दर्जाचा तांदूळ नाही. या मुळे तांदुळाची निर्यात कमी होते. स्थानिक बाजारात विक्रीसाठी बाजारभाव समाधान कारक मिळत नाही. शासन शेतकऱ्यांचे पीक हमीभाव ने खरेदी करून त्या पिकांची योग्य प्रकारे व्हिलेवाट करु शकत नसल्यामुळे पिकाला योग्य तो प्रतिसाद मिळु शकत नाही.
तरी शेतकऱ्यांनी अर्थशास्त्राच्या नियमांना समजून घेणे आवश्यक आहे.
बाजाराच्या नियमानुसार ज्या वस्तूची मागणी आहे त्या वस्तू (अन्नधान्य) चे उत्पादन घ्यायला पाहिजे जेणे करून शेतकऱ्यांना शासनावर अवलंबून रहावे लागणार नाही व त्यांच्या उत्पादन केलेल्या मालाला योग्य किंमत मिळेल. काही भागातील शेतकऱ्यांनी परवडत नसल्यामुळे पावसाळी पीक घेणे बंद करून पावसाळा गेल्यानंतर मूग व नंतर उन्हाळी पीक असा बदल केला आहे.या संबंधाने शेतकऱ्यांनी अवश्य विचार करावा.
शेतकऱ्यांनी आपल्या शेती मध्ये नवीन प्रकारे काही करण्यासाठी पीक बदल करावे. यासाठी कृषी खात्याच्या संपर्कात असावे. या परिस्थितीत गांभीर्याने विचार करून उद्योग व्यावसायिक बनून निर्णय घेतले पाहिजेत.
ग्रामीण नेतृत्वाने ग्रामीण अर्थव्यवस्था, सामाजिक, शैक्षणिक व्यवस्था उत्साहवर्धक करावी. तरच विकासाचे मार्ग खुले होतील आणि येणाऱ्या पिढ्या ‘उज्वल’ भविष्याचे स्वप्न पाहू लागतील! धान्य उत्पादकांनो ,पावसाळी पीक कमी करा. काहीतरी पर्याय काढा. आपणास पर्याय निवडल्या शिवाय पर्याय नाही. एकत्र येवून विचार मंथन आवश्यक. सामूहिक शेती केल्यास याचा लवकर फायदा होईल. आपण ज्याला मतं देतो तो नेता आणि तो पक्ष कधीच शेतकऱ्यांच्या उपयोगात येत नाही हा आजवरचा इतिहास आहे. शेतकरी अडचणीत असताना आपल्याबद्दल सर्वच राजकीय पक्ष मग गिळून बसतात आणि बोलत नाहीत. सत्तेत असलेला राजकीय पक्ष शेतकरी हिताचे निर्णय घेत नाही.असं का होतं? सरकारी कर्मचारी १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. पण दिवाळीला आर्थिक अडचण येऊ नये म्हणून १० दिवस आधी त्यांना पगार दिला. कारण काय तर ते संघटित आहे. त्यांची संघटना प्रबळ आहे. सर्व वेतन आयोग न चुकता सत्तेवर असलेले केंद्रशासन निर्णय घेवून अंमलबजावणी करते कारण त्यांना मतचे राजकारण करायचे असते. आपण शेतकरी मात्र ६० टक्क्यांपेक्षा जास्असून सुद्धा.
आपल्याला कुठलाच आयोग नाही. आपलं अनुदान कधी वेळेवर जमा होत नाही. पीक विम्याचे पैसे मिळायला असंख्य अडचणी. खत – औषधांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत .शेतमालाला भाव मिळत नाही. व्यापारी मनमानी आणि अधिकारी आपल्याला भिकाऱ्या सारखे वागवतायत कारण काय तर आपण संघटित नाही. शेतकऱ्यांच्याच्या संघटनेत शेतकऱ्यांचीच पोरं येत नाहीत. शेतकरी संघटना कमकुवत आहेत असे शेतकऱ्यांचीच पोरं बोंबा मारतात. काहीअंशी बरोबर सुद्धा आहे कारण बऱ्याच शेतकरी संघटना राजकीय पक्ष प्रेरित असतात. शेतकरी संघटना तुमच्या शिवाय कशी प्रबळ होणार ? शेतकऱ्यांचा दबाव गट निर्माण करायला हवा आणि तो सुद्धा निष्पक्ष.
तुका म्हणे उगी रहावे
जे जे होईल ते ते पहावे
वरील उक्तीला अनुसरून वागणे आता बंद करायला हवे. थोडे आक्रमक झाल्याशिवाय आपली किंमत या मायबाप सरकार म्हणजेच शासनाला कळणार नाही. जोपर्यंत मुल रडत नाही तोपर्यंत बऱ्याचवेळा त्याला दूध देत नाहीत. रडल्यावर त्याला दूध पाजले जाते मग आपण का बघत राहायचे? आपला हक्क आणि गरज ठासून सांगून त्याचा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करूया.
मित्रांनो निष्पक्ष शेतकरी संघटना तुमचा आवाज बनून रस्त्यावर लढणारी हवी .अनेक चांगले निर्णय शेतकरी हिताचे राज्यकर्त्यांना घ्यायला दबावगट निर्माण करून घ्यायला भाग पडायला हवे. सर्व शेतकरी नेत्यांनी आपला हेकेखोरपणा थोडा बाजूला ठेवणे आवश्यक. मी प्राध्यापक , कवी ,लेखक, शेतकरी असून शेतकऱ्यांसाठी काम करतोय याचा मला अभिमान वाटतो. कारण माझे पूर्वज शेतकरी होते. माझ्या वडिलांनी प्रथम नोकरी करून शेती सुद्धा केली. आणि आता मी शेती करतोय. म्हणून मी पण शेतकऱ्यांसाठी लढतोय.
तुम्हीही या..! चळवळीत सहभागी व्हा.!! विरोधात असले की शेतकऱ्यांसाठी बोंबलतात अन सत्तेत गेले की आपल्याला विसरतात अशा ढोंगी राजकीय पक्षातील नेत्यांच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा ..स्वतःच्या हक्काची लढाई स्वतः लढू..स्वाभिमानाने जगू. शेतकऱ्यांचा दबाव गट निर्माण करू. निष्पक्ष शेतकरी संघटना बनवून प्रबळ करून शेतकऱ्यांचे छोटे मोठे प्रश्न सोडवून घेऊ.!! या साठी तुमची संघटना हवी.
संघटना बनवूया आणि आपण सर्वांनी यात सहभागी होण्यासाठी संपर्क करा. आपला स्नेहशील शेतकरी मित्र
प्रा. सतीश फाटक (8169730345)
अध्यक्ष कोकण मित्र मंच
राज्यसमन्वयक किसान क्रांती
अध्यक्ष महाराष्ट्र फळ उत्पादक शेतकरी महासंघ.

What's your reaction?

Related Posts

1 of 269

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!