लेख

जगणे महाग होत आहे…….! लेखन : हर्ष नागवेकर (रत्नागिरी)

“माणसे गेली दूर आता मुके संवाद झाले,
मरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झाले
कुणाला ताण आहे, कुणाला तणाव आहे
सभोवताली जमलेला हा निर्जीव जमाव आहे.
स्वतंत्र झाली माणसे पण मेंदू बधिर झाले
मरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झाले”

कवी मंगेश गाडगीळ यांच्या शब्दात, प्रस्तुत उत्तर घेऊन, या उत्तराचा प्रश्न मांडण्यासाठी हा लेख लिहीत आहे. मुळात आपलं हे सुंदर जीवन आणि आपल्या या सुंदर जीवनामध्ये सर्व काही सुंदर होईल असं कधीच आणि काहीच नसतं , कारण आपल्या या सुंदर जीवनामध्ये आपल्याला भोगावे लागतात, अनेक सुख आणि अनेक दुःख यांचे कधी फुलणे बरे , तर कधी कधी अंत करणार साचवावे लागतात, दुःख, यातना आणि वेदनेचे मळे.
मित्रहो दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वळव्यामध्ये गारव्यासारखा. अशी असणारी मैत्री, आज कुठेतरी पैशाच्या मागे धावत असताना, आपल्या जिवलगाला विसरताना, दोस्त दोस्त ना राहा या भावनेत दिसून येते. मग तुम्हीच सांगा ज्या मैत्रिणी जीवन हलकं आणि आनंददायी केलं , तीच मैत्री आज आपल्यापासून दूर जात असेल तर जगणं सोपं तरी कसं होईल? म्हणून जगणं महाग होत आहे.

मित्रहो गल्लीतल्या, वाडीतल्या किंवा गावातल्या मुलांचा खेळताना होणारा कल्ला ,निसर्गातलं त्यांचा फिरणं, बागडण, मातीशी असलेली त्यांची नाळ, आज बाहेरचे बॅक्टेरिया आजार यांच्या नावाखाली केवळ आठवणींमध्ये दिसून येते. कारण, आजचा पिढीमधल्या या मुलांचे मॉम आणि पॉप्स मुलांच्या भविष्याच्या विचाराने जरा जास्तच पझेसिव्ह दिसतात, त्याच्यामुळे मुलं मात्र सकाळी सात ते संध्याकाळी सात ट्युशन मध्ये अडकलेले दिसून येतात. त्यामुळे मुलांचं बालपण जगणं राहून जातं. परिणामी मुलं घरात राहून मोबाईल, व्हिडिओ गेम, टीव्ही , लॅपटॉप यांच्या आहारी जातात. या सगळ्यात मुलांची दृष्टी आणि मेंदू तर कमकुवत होतोय. सोबत मुलांचा मानसिक संतुलन देखील बिघडल्याच्या बातम्या आमच्या समोर येतात. मग आम्हाला डॉक्टरला अमाप पैसे घालावे लागतात . यावरून एक लक्षात आलं की निसर्गामुळे मिळणाऱ्या मोफत आरोग्य , आज आम्हाला विकत घेण्याची वेळ आलेली आहे . आणि एवढं करून बालपणाचा तो आनंद नाहीच. म्हणून जगणं महाग होत चाललं आहे, किंबहुना ते आपण ते महाग बनवत चाललो आहोत.

मित्रहो, आजच्या आधुनिकीकरणाच्या जमान्यात “हम दो हमारे दो” ही संकल्पना दिसून येते. मात्र आज याचा वापर केवळ कुटुंब नियोजनासाठी केलेला आहे हे लोक विसरतात आणि चौकोनी कुटुंबाच्या नावाखाली एक भलतंच कुटुंब नियोजन करून मोकळे होतात . ज्यामध्ये घरातील वृद्ध आई-वडिलांना मात्र वृद्धाश्रमात ठेवलं जातं . आणि आम्ही नोकरी करतो त्यामुळे आमची मुलं पाळणा घरात ठेवली जातात. त्यामुळे कुटुंब जरी बनलं, तरी आयुष्य मात्र कुटुंबासोबत जगायचं राहून जातं. केवळ जीवन आहे म्हणून ते ढकललं जातं, या वळणावर जीवन दिसतं . म्हणून कुठेतरी जीवन महाग होत चालल आहे. कारण जीवन जगण्याचा गाभा आम्ही मारत आहोत.

पूर्वी शेजाऱ्याच्या घरात टाचणी जरी पडली तरी त्याचा गाजावाजा आजूबाजूला व्हायचा इतका एकोपा होता .मात्र आज शेजाऱ्याच्या घरात मयत झालं तर सोडाच, पण अगदी आमच्या शेजारी कोण राहतं याची सुद्धा कल्पना आम्हाला नसते. कारण आमचं जगणं हे आमच्या फ्लॅटच्या दरवाजाच्या आतपर्यंतच आम्ही मर्यादित ठेवलेला आहे . त्यामुळे जीवन जगण्यातला भावना, एकोपा या गोष्टी लुप्त होत आहेत. त्यामुळे मरण स्वस्त झाला आहे आणि जगणे महाग होत आहे.

मित्रहो, विशेषतः तरुण पिढीमध्ये नैराश्य, प्रेम ,तणाव ,अभ्यास यांसारख्या गोष्टीतून आत्महत्या घडलेल्या बातम्या आज झपाट्याने समोर येतात ना, तेव्हा प्रश्न पडतो, मरण जरी स्वस्त झालं असलं आणि नैराश्यामुळे आम्हाला जीवन आमचं महाग होताना दिसलं तरी ते संपवावं इतकं सहज सोपं आहे का हे? कवी सुरेश भट असं म्हणतात एवढेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. कारण आज धावपळीच्या युगात पैसा, अहंकार, बदला या सगळ्यात आपण निखळ जीवन जगण्याचे विसरून गेलो. आणि स्वतःच, ही दैवत दत्त देणगी असलेल्या सुंदर जीवन कष्टमय करत गेलो. त्यामुळे जगणं छळायला लागलं. त्यामुळे आपल्याला मरण सोपं वाटतं. पण या सगळ्याच्या पुढे जाऊन निखळ मैत्री, प्रेम ,एकोपा, माणुसकी या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्याला सुद्धा हेच जीवन महाग नाही, तर मौल्यवान वाटू लागेल. आणि त्यावेळेस जगणं सोपं वाटू लागेल….

What's your reaction?

Related Posts

1 of 269

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!