बातम्याराजकीय

पतितपावन मंदिर हे भागोजी शेठ किर आणि सावरकर यांच्या मैत्रीचे प्रतीक : नवीनचंद्र बांदिवडेकर

पतितपावन मंदिर भागोजिनी बांधले, ते सावरकरांनी बांधल्याची आठवीच्या पुस्तकातील चूक सरकारने दुरुस्त करावी

भागोजी शेठ कीर पुण्यतिथीनिमित्त भव्य रॅली, सहभोजन, सहभजन आणि समाजातील प्रतिभावंतांचा सत्कार

श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्यावरील स्वरचित भक्तीगीत भजनांचे २६ भजनी बुवांनी केले सुरेल गायन
रत्नागिरी (प्रतिनिधी) : पतितपावन मंदिर हे भक्ती भूषण श्रीमान भागोजी शेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. भागोजी शेठ कीर यांच्याकडे जातीय भेदभावा पलीकडची मानवतेची दूरदृष्टी होती.पतितपावन मंदिर भागोजिनी बांधले, हे मंदिर सावरकरांनी बांधल्याची आठवीच्या पुस्तकातील चूक सरकारने दुरुस्त करावी, यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला आहे. ही चूक तातडीने दुरुस्त झाली पाहिजे. मुलांना चुकीचा इतिहास शिकविला जाता कामा नये. तसेच पतितपावन मंदिर हे सर्वांचे आहे, सर्वांचे राहील, त्यावर कोणीही अधिकार सांगू नये, असे प्रतिपादन अखिल भारतीय भंडारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी येथे बोलताना केले. श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भागोजी शेठ कीर पुण्यतिथीनिमित्त रॅली, सहभोजन, सहभजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात होते. तसेच यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि दानशूर भागोजी शेठ कीर यांची मोठी प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्यावरील स्वरचित भक्तीगीत भजनांचे २६ भजनी बुवांनी यावेळी सुरेल गायन करीत कार्यक्रमात रंगत आणली. भजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र घुडे यांनी केले. हा कार्यक्रम रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने पतितपावन मंदिरात घेण्यात आला. या वेळी कोळी महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष ॲड. चेतन पाटील, जैन समाज संघाचे वर्धमान स्थानकवासी महेंद्र गुंदेजा, श्रीमान भागोजीशेठ कीर यांचे नातू अंकुर कीर, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर, भंडारी समाज नेते कुमार शेट्ये, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, प्रसिद्ध व्यावसायिक राजन मलुष्टे, परीट समाज संघाचे उपाध्यक्ष अमित कोरगावकर, राजापुर अर्बन बॅंकेच्या चेअरमन सौ अनामिका जाधव ,दलित मित्र एस. बी. खेडेकर,दामोदर लोकरे , प्रदिप पाडाळकर, विवेक सुर्वे, भगवान सुतार,बी.टी मोरे , रामभाउ गराटे , तेली समाज संघाचे रघुवीर शेलार , सचिन लांजेकर,बाळकृष्ण चव्हाण , विनायक हातखंबकर,सुनिलशेठ भोंगले , प्रसन्नशेठ आंबुलकर , राजाभाउ लिमये भगवती देवी ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर, प्रभाकर कासेकर , आण्णा लिमये आणि मान्यवर उपस्थित होते.
श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय भंडारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार लेखक अभिजीत हेगशेट्ये यांचा प्रतिभावान व्यक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी बांधकाम व्यावसायिक प्रसाद वाघधरे, भजनीबुवा सुदेश नागवेकर, प्रतिभावंत कवी देविदास पाटील, धार्मिक क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्ती प्रकाश वराडकर यांनाही मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी, मंडप सजावटीसाठी संतोष डेकोरेटर्सचे नवनीत कदम यांचाही सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख वक्ते श्री. बांदिवडेकर म्हणाले, ‘भागोजीशेठ कीर यांनी जातीय भेदभाव करू नये हा सर्वांत मोठा धडा घालून दिला. ते मानवतावादी होते, हिंदूत्ववादी होते म्हणूनच कार्य करताना त्यांनी केवळ आपल्या समाजापुरतेच न करता मानवतेसाठी केले, देशासाठी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीपुरुष होते, त्यांच्याकडूनच भागोजीशेठना प्रेरणा मिळाली.
ते पुढे म्हणाले, ‘भागोजीशेठनी आपला मुंबईतील नऊ एकरचा भूखंड दिला, पण या महामानवाला मात्र ९० फुटांमध्ये बंदिस्त करण्यात आले. ही गोष्ट राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर गेल्यावर्षी मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहरात नाना शंकरशेठ आणि भागोजीशेठ कीर यांचे पुतळे उभारणार असल्याची घोषणा केली आणि त्यासाठी २० कोटींची तरतूदही केली. मात्र त्यांचे हे स्मारक त्यांच्याच भूमीत व्हावे, अशी आमची मागणी आहे. आजच्या मुलांना चुकीचा इतिहास शिकविला जात आहे.खरा ईतिहासच पुढे आला पाहिजे .
कोळी महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष ॲड चेतनदादा पाटील यांनी आपल्या मनोगता मध्ये असा दानशूर महामानव देशात दुसरा कोणी जन्माला आला नाही त्यांचे कार्य अखंड मानवतेसाठी अतुलनीय आहे या कोकणसुपुत्र आणि मुंबई शिल्पकाराचे नाव मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाला देण्यासाठी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीनजी गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्रभाउ फडणवीस यांच्याकडे कोळी महासंघाच्या वतीने केलेली आहे. आज या कार्यक्रमात हिंदु समाजांचे सर्व लोक एकत्र येवुन श्रीमान भागोजीशेठ यांच्या ऐतिहासिक कार्याच्या उजळणीसाठी एकत्र आलेत तसेच लवकरच सर्व समाजांचे शिष्ठमंडळ मुख्यमंत्र्याच्या भेटीला घेवुन जाणार असल्याचे सांगितले. श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या कार्याची आठवण देशाला कायम रहावी यासाठी देशाचा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी भावना व्यक्त केली .
या प्रसंगी प्रस्तावना करताना राजीव कीर यांनी भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. सौ. प्रज्ञा तिवरेकर यांनी केले. रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथील चौक रस्त्यावर सर्कल बनवून तेथे श्रीमान भागोजी शेठ कीर यांचा तसेच संत श्रेष्ठ गाडगे बाबा यांचे पुतळे उभारण्याची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली असता त्यांनी याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. याचा पाठपुरावा करण्याचा मुद्दाही आजच्या कार्यक्रमात उपस्थित करण्यात आला.या कार्यक्रमात वैश्य समाज , तेली समाज , कटबु समाज , नाभिक समाज , खारवी समाज , गाबीत समाज , राठोड समाज, वर्धमान स्थानकवासी जैन समाज , त्वाष्टा कासार समाज , शिंपी , कुणबी , सुतार , ब्राह्नण , मराठा, सोनार ,कोळी समाजाचे, कुंभार , परीट, भंडारी असे अठरापगड बारा बलुतेदार सर्व समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते .पुण्यतिथी निमित्ताने रत्नागिरी शहरात रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीमध्ये संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचा सामाजिक संदेश देणारा चित्ररथ सहभागी झाला होता.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!