राजकीय

महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करा वरूण सरदेसाई – योगेश मुळे

संगमेश्वर: महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यापासून शिवसेना पदाधिकारी आणि नेते सरकारच्या प्रत्येक गोष्टीत खुसपट काढण्याची संधी शोधताना दिसत आहेत. वास्तविक विरोधी पक्ष म्हणून जनहिताची कामे सरकारकडून करून घेण्याची आयती संधी ठाकरे गटाला मिळाली आहे. मात्र मागील ४ महीने सातत्याने पूर्वाश्रमीच्या आपल्याच नेत्यांचा अपमान करण्यात पक्षनेतृत्व व पदाधिकारी धन्यता मानत आहेत. ज्या आमदारांच्या निष्ठेच्या पाठबळावर सत्ता उपभोगली आज त्यांचा उल्लेख घृणास्पद रीतीने करणारे ठाकरे गटाचे पदाधिकारी आपली मनोवृत्ति किती कोती आहे याचे राजरोसपणे प्रदर्शन घडवत आहेत. अशी बोचरी टीका योगेश मुळे यांनी केली आहे. वरूण सरदेसाईंच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, सरदेसाई ज्या उदय सामंतांवर टीका करून पक्षनेतृत्वाकडून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. आपण सत्तेचा वापर कधीतरी जनसेवेसाठी केला आहे का हे तपासावे. लोकांची माथी भडकावण्यासाठी भावनिक डोस द्यायचे आणि त्यातही ठासून असत्य बोलायचे एवढीच गुणवत्ता असल्याने युवासेनेचे सचिव पद त्यांना लाभले होते. याउलट ना. उदय सामंत यांच्या पाठीशी रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रातील जनतेचे प्रचंड प्रेम होते. त्यामुळेच ते कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत हे न पहाता सलग चार वेळा विधानसभेत आपला प्रतिनिधी म्हणून जनतेने पाठवले आहे. ही लोकप्रियता आपल्या युवराजांकडेसुद्धा नाही याचे भान सरदेसाई यांनी ठेवायला हवे. त्यामुळे सवंग प्रसिद्धीसाठी 'उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा' असे विधान केले आहे त्याबाबत माफी मागा. मुळे पुढे म्हणाले, मागील ४ महिन्यात ३ मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले ही वस्तुस्थिती आहे. याला कोणीही नाकारत नाही. मात्र जणू काही ४ महिन्यातच महाराष्ट्राचे वाटोळे झाले म्हणुन आज गळा काढता आहात तर आधीच्या दोन-अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपण आणलेल्या प्रकल्पांची यादी जाहीर तरी करा. सध्याचे सरकार आणि त्यातील मंत्री सुसंस्कृत आहेत. तुमच्या प्रत्येक अपप्रचाराला पुरून उरणारे आहेत. त्यामुळे त्यांचे राजीनामे मागून आपल्या अकार्यक्षमतेचा बाजार करून घेऊ नका. दीड लाख रोजगार निर्मिती क्षमता असणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प सप्टेंबर २०२० मध्ये गुजरातमध्ये जाण्याचे जाहीर झाले होते. त्यासाठी जबाबदार असणार्‍या तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाईंचाच या प्रकल्पाला विरोध होता. तसे त्यांनी ७ जानेवारी २०२० रोजी स्वतः जाहीर केले होते. ८० हजार रोजगार निर्मिती करू शकणारा बल्क ड्रग पार्क प्रकल्प ऑक्टोबर २०२० नंतर हिमाचल प्रदेशमध्ये जाणार हे निश्चित झालेले. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंनी अडीच वर्षांत कोणतेही प्रस्ताव केलेले नाहीत. त्याचप्रमाणे टाटा एयरबस प्रकल्पाचे अपयशही मविआचेच. यासंदर्भात आपण सत्ताधारी असताना कोणते प्रयत्न केले याबाबत पुरावे द्या. असा रोखठोक सवाल यावेळी योगेश मुळे यांनी उपस्थित केला. यासाठीच आपण स्वतः आत्मपरीक्षण करा. प्रश्न विचारण्यापूर्वी नेमके कोणाला विचारायला हवेत याचा गृहपाठ पूर्ण करा. जनतेच्या हिताचे प्रश्न जरूर विचारा मात्र दिशाभूल करणारे प्रश्न विचाराल तर तुम्हीच अडचणीत याल. कारण जेवढ्या आक्रमकपणे तुम्ही असत्य प्रसृत कराल त्याच्यापेक्षा दुप्पट आक्रमक होऊन सत्य बाहेर पडेल आणि मग तुमचीच पळता भुई थोडी होईल. त्यामुळे उद्योगमंत्र्यांना त्यांचे काम करू द्या. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. *दखल न्यूज महाराष्ट्र.*

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!