लेख

वाडीवरची होळी

आता ’होळी आली’ म्हटलं की हे सगळं बालपण आठवत राहतं. छळत राहत. लहानपणी केलेल्या गमती- जमती, करामती सारं काही आठवत राहतं. काळ बदलत गेला. तसं होळीचंही स्वरूप बदलून गेलंय. त्यावेळी सारी वाडी एकत्र यायची. आनंदाने बेभान होवून होळी साजरी करायचं. आमच्या वाडीची होळी असा एक अभिमानही त्यात होता.जस आमचं आणि होळीच नात होत त्या पेक्षा जास्त पट्याच्या मळी सोबत होत;कारण होळी असो अथवा अन्य काही आम्ही जास्त खेळ त्याच मळीत खेळत होतो. त्या मळीत आखलेल कोणत ही मैदान गजबजलेलं असायच मग ते क्रिकेट असो अथवा कबड्डी… आता गावागावातील राजकारणाचं सावट होळीवर पडलय. तरीही होळी अजून टिकून आहे.
आज त्याच पट्याच्या मळीत गेलो पण ते गजबजलेलं मैदानं कुठं दिसत नव्हत ना ती पोरं… सगळ एकदम सुन-सुन झाल होतं. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि डोळ्यात एकदम आश्रूच आले. ते पूर्वीचे दिवस पुन्हा-पुन्हा आठवू लागले..आणि मी त्या दिवसात हरवून गेलो.. शिमगा आठ दहा दिवसावर आला की आम्ही सगळी लहान पोरं संध्याकाळी वाडीच्या पोलाच्या मळीत जमायचो. चढणाऱ्या अंधारासोबत मळीत शिमग्याच्या गप्पा रंगत जायच्या. पहिल्यांदा कोणाच गवत, पेंडा चोरायचा ते ठरवायचं. वाडीतील जे लोक भांडायचे त्यांच्या गवतापासून पहिली सुरवात व्हायची. मग कोणाचे भारे आले नसतील तर रात्रीच्या अंधारात ते चोरून आणायचे. परत होळीचा दिवस उगवला की सकाळपासूनच सगळेजण प्रत्येकाच्या घरी गवत मागायला जात असू. ज्याच गवत आधीच चोरलेल असायच त्या घरातल्या म्हाताऱ्या बायका लई शिव्या घालायच्या. मग पोरं बो... बो... करुन दारातच मोठ्यानं बोंबलायची. “होळी रे होळी पुरणाची पोळी सायबाच्या पाठीत बंदुकीची गोळी”. मध्ये त्या घरमालकाचं नाव घालून पोरं वाडी जागी करायची. अखेर गवत घेऊनच पोरं पुढच्या दाराकडे सरकायची. दिवसभर जमवलेल गवत आणि भारे घेऊन मग अंधार पडू लागला की होळीच्या मळीत ढीग करून ठेवल जायच्या. अंधार पडायला लागला की पोरं शेकोटी पेटवत. काही पोक्त मंडळी शास्त्रोक्त पद्धतीने होळी रचायची. पहिल्यांदा होळी रोवली जायची. मग बाजूने भारा अन् गवत रचल जायच. आकाशात पूर्वेच्या बाजूने पुनवेचा चंद्र उगवून वर आलेला असायचा.

मग सगळी पोरं आट्यापाट्या खेळायला सुरुवात करत. आधी मैदान तयार करायचो;त्या साठी आम्ही दगडी आणि राख आणायचो आणि मग खेळायची सुरुवात व्हायची. पूर्ण मळी भरून जायची पण पोरं कमी होत नव्हती. खूप चिडखोर पोरं भांडण पण करत पण ती भांडणे तेवढ्या पुरतीच. आट्यापाट्या खेळण्याची मज्जाच वेगळी होती. मग नंतर कबड्डी सुरू व्हायची. सगळे जण खूप आनंद लुटायचे.
5-6 दिवस झाले की आमची पट्याच्या मळीत एक पार्टी आयोजित केली जायची.मग त्या साठी सगळ्यांनी पैसे आणि कोणी धान्य तर कोणी चटणी,तेल,मीठ आणायचं ते ठरवायचं मग मस्त पार्टी एकदम दणक्यात साजरी केली जायची.
त्या साठी काही वाडीतील वरिष्ठ मंडळी मदत करायचीत.
नंतर शेवटच्या दिवशी दुपारपासून पेटलेल्या घराघरातल्या चुली आता विझत आलेल्या असायच्या. घरातल्या बायकांची नैवद्याची ताटं भरण्याची लगबग सुरु व्हायची. पहिली पोळी होळीला मग घरच्यांना. ही वाडीची रीत, परंपरा,आणि संस्कृती…
सगळी बायका पोर अन् मोठी माणस अंथरूण पांघरूण घेऊन होळीला यायची आणि खेळ बघत बसायची … काही मोठी माणस मुलांमधे मिसळून खेळायला लागायची.
खेळून झाल की नंतर होळीला नैवद्य दाखवायला सगळी गडी माणसं एका हातात नैवद्य आणि दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या धरून होळीकडे उभी रहायची. मग वाडीचे गावकर होळीची पूजा करून नारळ फोडायचे. नंतर होळीला जाब लावला जायचा; कोणाचा नवस बोलला जायचा तर कोणाचा फेडला जायचा. त्यानंतर होळी पेटवायचा कार्यक्रम सुरु व्हायचा. गावकर गवत हातात घेऊन होळीला आग लावायचे . जसजसा मोठा अग्नी होत जायचा तशी सगळी पोरं मोठ्याने होळीभोवती बो.. बो… बोंबलत फिरायचे. मग गडी माणस नारळ होळीत टाकायचे ते नारळ काढायला लहान पोरं पुढं पुढं करायची.
उगवलेल्या चंद्राच्या अन होळीच्या उजेडात रात्री उशिरा पर्यंत गावतली मंडळी होळीच्या बाजूला शेकत बसायची. होळीला थंडी संपते. हा गावकऱ्यांचा समज. होळीभोवती रात्रभर गप्पांचा फड रंगायचा. गंमती जमती व्हायच्या. नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेली माणसं होळीत गावाला आलेली असायची. सगळ्यांच्या भेटीगाठी व्हायच्या. होळीची जळकी राख अंगारा म्हणून काहीजण कपाळाला लावायचे. कुणी अंगाला लावायचा….

….आता हे सगळं गावासोबत मागं पड़त चाललय. शहरात सिमेंटच्या जंगलात चिंचोळ्या जागेत पेटणाऱ्या होळ्या आता आपलं मन रूजवू शकत नाहीत. रंगाची चार बोटे गालावर लावून आभासी जगात सेल्फी सोडून त्यावरच्या कमेंट वाचण्यापुरंतच आता काय ते इथलं होळीच अस्तित्व. पण होळी आली म्हटलं की हे सगळं बालपण आठवत राहतं. छळत राहतं. मन आतून पोखरत जातं. सगळी केलेली धमाल आठवते. लहानपणी केलेल्या गंमती – जमती, करामती सगळं काही आठवतं. काळ बदलत गेला.
आपणही काळासोबत बदलत जातोय. यांत्रिक बनतोय. पूर्वी सगळे लोक वाडीत एकत्र यायचे. आनंदाने बेभान होवून होळी साजरी करायचे. आमच्या वाडीची होळी असा एक अभिमान त्यात असायचा. आताही गावाकडच्या होळ्या पेटतात. पण गावागावातील राजकारणाचं सावट होळीवर पडलय. तरीही होळी अजून टिकून आहे. नवीन पिढी या प्रथा मानायला तयार नाही. वाडीवरच्या नवीन सुना आता शेणात हात घालत नसतात. त्यांची बोटे फक्त शुभेच्छा देण्यापूरती मोबाईलच्या स्क्रीनवर फिरत राहतात. एकेकाळी होळीचा मान असलेला गावकर ही आता राहिला नाही. आणि वाडीतील वरिष्ठ मंडळी ही कोणी येत नाही. आता कोणी भारे चोरत नाही ना कोणी गवत चोरण्याचे प्लॅन करत..सगळे जण व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम वर स्टोरी आणि स्टेटस लाच होळी चिकटवून ठेवत आहेत.
सगळीकडे एल.ई.डी दिव्यांचा झगमगाट असतो. वाडीवरची पोलाची मळीही त्या पूर्वीच्या मुलांची आठवण आजही काढतेय आणि आश्रु वाहतेय. पट्याची मळी एकटीच होळीकडे पाहत आहे .
कधी काळी आपल्या आंगा खांद्यावर नाचलेली होळी आता स्थब्ध उभी आहे आणि रडत आहे. ती हाक मारत आहे पण कोणालाच तिची हाक ऐकायला वेळ नाही.एके काळी आपल्याला आनंद देणारी ती होळी आणि पट्याची मळी आपली वाट पाहत आहेत पण त्यांच्या त्या हाकेला साद घालत फक्तं 2-4 लहान मुले तिथं बसली आहेत…
कित्येक जण आले अन् गेले पण त्यांची आठवण काढणारी पट्याच्या मळीत असणारी दगड तिथेच बसून आहे.कित्येक चिमुकले पाय तिच्या अंगा खांद्यावर खेळून गेले आणि आजही चिमुकले पाय माझ्या अंगा खांद्यावर खेळायला येतील या आशेने ती रस्त्याकडे हिरमुसलेल्या चेहऱ्याने एकटक पाहत आहे.ती वाट पाहणारी दगड प्रत्येक होळीला डोळ्यासमोर येवून स्मरणकेंद्रातील जिवंत जाणिवांना फक्त आणि फक्त छळतच राहते… वाडीवरची हरवलेली होळी~ लेखन :- धिरज फोंडे.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!